About Us

dnyanjyotmarathi.com

मराठी माणूस हा ज्ञानार्जनांत आघाडीवर आहेच, तसा तो ज्ञानदानातही तितकाच अग्रेसर राहावा असे मनापासून वाटते. ज्ञानाची परिसीमा अमर्याद आहे. याकरिता ज्ञान मिळवण्याची आपली साधने आपण अधिक व्यापक आणि कार्यक्षम बनवण्याची आवश्यकता आहे. ज्ञान मिळवून ते आत्मसात करता आले पाहिजे, तरच ज्ञानाच्या अंतरंगात दडलेल्या खऱ्या आनंदाचा व समाधानाचा लाभ आपल्याला मिळू शकेल. म्हणूनच हा छोटासा, प्रांजळ प्रयत्न….

To know something of everything and everything of something एवढे तरी ज्ञान आपल्याला असायला हवे.

ज्ञानाने मनुष्याच्या मनाची आणि अनुभवाची कक्षा रुंदावली पाहिजे. त्याचे मन जास्त चिंतनशील आणि उन्नत व्हायला पाहिजे. ज्याचे मन मोठे, तो माणूस मोठा गणला जातो. खरे ज्ञान मनुष्याचे मन थोर बनवते आणि त्याच्या बुद्धीची पातळी वाढवते.

प्रवाही मन प्रभावी बनवण्याचे कार्य ज्ञानच करीत असते. ज्ञानाच्या योगाने स्वतःच्या विस्तृत अज्ञानाची परिसीमा मनुष्याला जाणता येते. या अथांग ज्ञानाचे विविध पैलू समजून घेण्याचा मनुष्याला सतत प्रयत्न करायला हवा.

ज्या ज्ञानाच्या योगाने आपल्याला समाधानाचा व आनंदाचा लाभ मिळतो जे ज्ञान बुद्धीला स्थिर करते जे ज्ञान परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीकडे कौतुकाने आणि कुतूहलाने बघण्यास शिकवते असे ज्ञान आपण जन्मभर मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.

सर्व विषयांबद्दल थोडे थोडे आणि काही विषयांबद्दल सर्वांग परिपूर्ण ज्ञान संपादन करायचे म्हटले तरी एक प्रदीर्घ आयुष्यही पुरे पडणार नाही. पण त्या हेतूने कालक्रमणा करायला हे कार्य समाधान देते. म्हणून मराठी भाषेतील विविध ज्ञानाचे संकलन करून आपणासमोर या वेबसाईटच्या माध्यमातून ते ज्ञान प्रकाशित करत आहोत.

या वेबसाईट मध्ये विविध सुविचार, शुभ दिवस संदेश, प्रेरणादायी संदेश, वाढदिवस संदेश, आभार संदेश, विनोद असतील. संस्कृती, परंपरा, विविध सनांची माहिती, व्रतवैकल्य, उखाणे, पारंपरिक दागिने, पारंपरिक वेशभूषा, संस्कार यांची माहिती असेल. सामान्य ज्ञान, बोधकथा, निबंध ,म्हणी, वाक्यप्रचार, मुला मुलींची नावे अशाप्रकारची माहिती असेल. तसेच अध्यात्मिक विषयातील गीता, इतर ग्रंथ संपदा, साहित्य, संत गाथा, अभंग, निरूपण, दृष्टांत वाचायला मिळतील.

आरोग्य या विषयांतर्गत; हे करून पहा, आजीचा बटवा, सौंदर्य , आदर्श व्यक्तिमत्व, थोर विचारवंतांची जीवनचरित्रे अनुभव, व्यायाम, योग, व्यक्तिमत्व विकास याविषयी माहिती असेल. आयुष्याचा प्रवास करत असताना कोण कोणत्या स्थळांना, गड, किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजेत याची माहिती असेल.

तसेच वाचकांच्या सर्वात आवडीचा विषय म्हणजे राशी भविष्य. यामध्ये दैनंदिन, मासिक, वार्षिक राशिभविष्य ची माहिती देणार आहोत. पोटोबा करताना विविध पाककला, स्वयंपाक घरातील सहज सोप्या युक्त्या क्लुप्त्या, स्वयंपाक करत असताना घ्यावयाची काळजी, पारंपारिक पदार्थ, ऋतुमानानुसार काय आहार घ्यावा व तू कसा तयार करावा याबद्दल लिखाण असेल. युवा, गृहिणी यांच्यासाठी स्वयंरोजगार या विषयात व्यवसाय, कुटीर उद्योग, लघु उद्योग, व्यवसायच का निवडावा, नोकरीतील बंधने याबाबत माहिती देण्याचा चांगला प्रयत्न राहील. करमणूक, कुतूहल, शास्त्रीय ज्ञान, शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्य, विज्ञान, अध्यात्म, आनंद अशा विविध विषयावर माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.